सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न

मुंबई – अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती समजताच तिच्या घरी निकटवर्तीयांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. सोनाली सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. स्वतः सोनालीनेच आपल्या व्याधीबाबतची माहिती दिली आहे.
“जेंव्हा आपण आयुष्याकडून काहीही अपेक्षा करत नसतो. तेंव्हाच आपल्यासमोर भीषण संकट येऊन उभे ठाकते. कॅन्सरची लागण झाली असल्याचे नुकतेच लक्षात आले आहे. काही आजारांसाठी केलेल्या चाचण्यांमध्ये ही व्याधी म्हणजे कॅन्सर असल्याचे उघड झाले आहे.’ असे सोनालीने म्हटले आहे. आपल्या निकटवर्तीय, मित्र आणि नातेवाईकांकडून आपल्याला मिळणारा पाठिंबा आणि दिलासा खूप मोलाचा आहे. त्याबद्दल त्या सर्वांना सोनालीने धन्यवादही दिले आहेत आणि आपल्याला मिळणाऱ्या शुभेच्छांच्या आधारेच आपण कॅन्सरशी लढा देणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता इरफान खानलाही कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
कॅन्सरशी लढा देण्यासाठी त्वरित आणि प्रभावी उपचार हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असल्याचेही सोनालीने म्हटले आहे. तिला झालेला कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे, हे तिने स्पष्ट केलेले नाही. मात्र नातेवाईक, मित्रमंडळी आणि निकटवर्तीयांकडून मिळालेल्या शुभेच्छांबाबत तिने आभार व्यक्त केले आहेत.
“सरफरोश’, “दिलजले’ आणि “डुप्लिकेट’सारख्या सिनेमांमधील हिरोईन सोनालीचा विवाह चित्रपट निर्माता गोल्डी बहलबरोबर झाला असून या दाम्पत्याला रणवीर नावाचा 13 वर्षांचा मुलगाही आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात सोनालीने चित्रपटांपेक्षा टिव्ही मालिकांमध्ये अधिक काम केले होते.
एका रिऍलिटी शो मध्ये परीक्षक म्हणून ती अगदी अलिकडेच सक्रिय होती. नुकतेच तिने ही जबाबदारी सोडून दिली आहे. सोनालीला कॅन्सर झाल्याच्या बातमीमुळे हिंदी – मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी आपल्याला धक्का बसल्याच्या भावना व्यक्त केल्या आणि तिच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





