“ताई.. मन मोठं करा, हा सल्ला अजित पवारांना द्या”, भाजपाचा खासदार सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला!
![“ताई.. मन मोठं करा, हा सल्ला अजित पवारांना द्या”, भाजपाचा खासदार सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/supriya-sule.jpg)
मुंबई |
गेल्या महिन्याभरात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ काहीशा मंद गतीने होत असली, तरी देखील हे दर १०० रुपये प्रतिलिटरच्या वर गेले आहेत. त्यामुळे आधीच सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असताना दुसरीकडे स्वयंपाकाच्या गॅसचे देखील दर वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार राज्यांकडे दर कपातीसाठी बोट दाखवत असताना राज्य सरकारे देखील केंद्राकडे यासाठी मागणी करत आहेत. त्यामुळे नेमकी दरकपात कुणाच्या हातात आहे, हेच सामान्यांना कळेनासं झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत दरकपातीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर भाजपानं खोचक शब्दांत सल्ला दिला आहे.
- पेट्रोल-डिझेलचे वाढते दर
खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि स्वयंपाकाच्या गॅसचा मुद्दा उपस्थित केला. हे दर कमी करण्यासाठी करकपातीसंदर्भात निर्णय घ्यावा आणि सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना केली. या मुद्द्यावरून भाजपानं सुप्रिया सुळे यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळेंच्या या मागणीवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळेंच्या मागणीचं एक वृत्त पोस्ट करत त्यावर ट्वीट केलं आहे. “सुप्रिया सुळे ताई, मन मोठं करा! केंद्रानं अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट अजित पवार यांना द्या. ते तुमचं तरी ऐकतात का पाहू”, असं केशव उपाध्येंनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
@supriya_sule ताई, मन मोठं करा! केंद्राने अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची! केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट @AjitPawarSpeaks यांना द्या. ते तुमच तरी ऐकतात का पाहू pic.twitter.com/MQnJxhFG3b
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 10, 2021
गेल्या महिन्यात ४ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी अनुक्रमे ४ रुपये आणि ८ रुपये प्रतिलिटर इतकी कमी केली होती. त्यामुळे काही प्रमाणात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर झाल्या होत्या.
- तेल उत्पादन क्षेत्रावरही ओमायक्रॉनचं सावट?
मोठ्या शहरांचा विचार करता देशात सर्वाधिक इंधन दर मुंबईत आहेत. जागतिक स्तरावर विचार करता कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे इंधनाच्या मागणीवर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता असताना या संकटाचा सामना कसा करायचा, यावरही जागतिक स्तरावरील तेल उत्पादक चर्चा करत आहेत.