कात्रज परिसरात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून तरुणाचा खून
पुणे | पुण्यातील कात्रज परिसरात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चंद्रभागा चौक परिसरात हा प्रकार घडला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने दहशतीचे वातावरण पसरले आहे.गोळीबार झाल्याची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रभागा चौक परिसरात एक तरुण थांबला होता. त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. या गोळ्या वर्मी बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गोळ्या झाडल्या नंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.