संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्ताला इंद्रायणी घाटावर लुटले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/dc-Cover-bsnudco08r3igtj44duecnr7m4-20170829064312.Medi-1.jpeg)
प्रतिनिधी
आळंदी – आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या एका वृद्ध भक्ताला दोन चोरट्यांनी लुटले. वृद्ध भक्ताच्या गळ्यातील दोन लाख 40 हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ज्ञानोबांचे मुखदर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर त्याच दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची बोरमाळ चोरल्याचे भक्ताला समजले.
दत्तात्रय सिताराम खोकराळे (वय 61, रा. खामुंडी सोमनाथ नगर, ता. जुन्नर) या माऊली भक्ताने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 30) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय हे त्यांच्या कुटुंबियांसोबत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शनासाठी जात होते. देवदर्शनापूर्वी ते इंद्रायणी नदीच्या घाटावर हात पाय धुण्यासाठी गेले. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर जबरदस्तीने दत्तात्रय यांच्या गळ्यातील दोन लाख 40 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली.
सोनसाखळी पळवल्या नंतर देखील दत्तात्रय माऊलींच्या दर्शनासाठी गेले. माऊलींचे मुखदर्शन घेऊन इंद्रायणी नदीच्या घाटाकडे पायी चालत एताना एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याची बोरमाळ दोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याचे दत्तात्रय यांना समजले. त्यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी गुन्हा नोंदवला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.