फक्त घोषणा आणि भाषणे करुन शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाहीत, रक्षा खडसे यांची ठाकरे सरकारवर टीका
![Raksha Khadse criticizes Thackeray government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/raksha-khadse01jpg_201905241311.jpg)
मुक्ताईनगर – राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांसह जमिनीचेही नुकसान झाल्यामुळे शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे. या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. फक्त घोषणा करुन आणि भाषणे करुन शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाहीत, अशी टीका केली आहे.
रक्षा खडसे यांनी म्हटले की, ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकर्यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. मात्र, खूप कमी मदत शेतकर्यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकर्यांचे मला फोन येत आहेत. सरकारने शेतकर्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे, असा आरोप रक्षा खडसे यांनी केला आहे. मी सरकारला याबाबत पत्र लिहिणार असून शेतकर्यांकडे लक्ष द्या, अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप खासदार रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येणार आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत.