पाच खलाशांसह मासेमारी नौका अजूनही बेपत्ता; एकाचा मृतदेह सापडला
![Fishing boats with five sailors still missing; The body of one was found](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/Fisherman.jpg)
रत्नागिरी |
तालुक्यातील जयगड येथून पाच दिवसांपूर्वी मच्छीमारीसाठी गेलेल्या नौकेवरील सहा खलाशांपैकी एकाचा मृतदेह गुहागर किनाऱ्यापासून २० सागरी मैल खोल समुद्रात आढळून आला आहे. मात्र पाच खलाशांसह नौकेचाही अजून ठावठिकाणा लागलेला नाही. शनिवारी सायंकाळी उशीरा अनिल आंबेरकर ( वय ५०, रा. साखरी आगर—गुहागर) या खलाशाचा मृतदेह आढळून आला, तर दत्तात्रय झगडे, दगडू तांडेल, गोकुळ नाटेकर, अमोल जाधव आणि सुरेश कांबळे हे पाच खलाशी बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्या नौकेवर संपर्कासाठी कोणतीही यंत्रणा नाही. नौकेवरील एका खलाशाने गेल्या मंगळवारी फोनवरुन दाभोळजवळ कुठेतरी असल्याचे मालकाला कळवले होते. त्यानंतर काहीच संपर्क झालेला नाही.
नासिर हुसेनमियॉ संसारे यांच्या मालकीची ‘नावेद ‘ ही मच्छीमारी बोट गेल्या २६ ऑक्टोबरला जयगड बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाली होती. ही बोट २८ ऑक्टोबरपर्यंत जयगड बंदरात येणे अपेक्षित होते; मात्र ३० ऑक्टोबरपर्यंत ही नौका जयगड बंदरात परत आली नाही. नौकेशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला होत. तटरक्षक दलालाही याची माहिती देण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्या नौकचा शोध घेण्यासाठी मत्स्य विभागाची नौका, तटरक्षक दल, पोलिसांची यंत्रणा कार्यरत आहे. तसेच सर्व मच्छीमारी सहकारी संस्थांच्या सभासदांना कळवले आहे. त्यांच्यामार्फतही शोध चालूू आहे, अशी माहिती जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर यांनी दिली.