“महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासण्याची वेळ आली आहे”- चंद्रकांत पाटील
!["It's time to check the heads of everyone in the Mahavikas Alliance" - Chandrakant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/bjp-chandrakant-patil-on-sanjay-raut-1.png)
पुणे |
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर सातत्याने टीका करत असतात. राज्यातल्या पावसाच्या संकटामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी सादर करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारने अद्याप पंचनामे केले नसून कोणतीही मदत दिलेली नसल्याचा आरोपही केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय विषयावरही भाष्य केलं असून महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासण्याची वेळ आली आहे, असं विधान केलं आहे.
याविषयी चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना विजय वडेट्टीवार यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. वडेट्टीवार म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची जिरवायची असं आमचं नितीन गडकरींसोबत ठरलं होतं. कारण, त्या दोघांचं जमत नाही. त्यांच्या याच विधानावर बोलताना पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासायची वेळ आता आली आहे. कारण ज्याला ज्याला जे सुचेल ते तो करत आहे आणि जिरवणे वगैरे हे जाहीर सभेत वापरण्याचे शब्द आहेत का? त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल हा जो स्वभाव महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा झाला आहे, त्याचाच तो भाग आहे. नितीनजी आमच्या सगळ्यांचे नेते आहेत. आमच्या सगळ्यांचे पालक आहेत. ते आम्हा सर्वांची काळजी घेतात. त्यांची विचारांवरची आणि पक्षावरची निष्ठा टोकाची आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी हा शोध कुठून लावला ते माहित नाही”.