सापाचा दंश देऊन हत्या करण्याचा नवा ट्रेंड- सुप्रीम कोर्ट
![New trend of killing by snake bite- Supreme Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/snakes-1.jpg)
राजस्थान |
सापाच्या सहाय्याने महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना, सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. आरोपी राजस्थानचा असून सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं की, “विषारी साप आणणं आणि त्यांच्या सहाय्याने हत्या करण्याचा नवा ट्रेंड आहे. राजस्थानमध्ये हे आता नेहमीचंच झालं आहे”. वकील आदित्य चौधरी आरोपीची बाजू मांडत होते. यावेळी त्यांनी आरोपींविरोधात कोणताही थेट पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला. आरोपांनुसार, कृष्णा कुमार मुख्य आरोपीसह गारुड्याकडे गेला होता. १० हजारात त्यांनी साप विकत घेतला होता. चौधरी यांच्या दाव्यानुसार, आरोपीला त्यांचा मित्र साप किंवा विष विकत का घेत होता याची कल्पना नव्हती. वैद्यकीय कारणासाठी याची गरज असल्याचं त्याला सांगण्यात आलं होतं. कृष्णा कुमार सापाला घेऊन महिलेच्या घरीदेखील गेला नव्हता असं यावेळी त्यांनी सांगितलं. आरोपी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून त्याच्या भविष्याचा विचार करत जामीन दिला पाहिजे असा युक्तिवाद त्यांनी केला.
२०१९ मध्ये सुनेने सासूची सापाचा दंश देऊन हत्या केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. सून अल्पनाचं जयपूरमधील मनिष नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप होता. अल्पना आपली सासू सुबोध देवी यांच्यासोबत राहत होती. अल्पनाचा पती आणि भावोजी लष्करात असल्याने घऱात नसायचे. सासरेदेखील कामानिमित्त घऱी नसायचे. सचिन आणि अल्पनाचं १२ डिसेंबर २०१८ रोजी लग्न झालं होतं. अल्पनाचे मनिषसोबत विवाहबाह्य संबंध असून ते नेहमी फोनवर बोलत असतं. सुबोध देवी यांना याची माहिती मिळाल्यानंतर यावरुन त्या सूनेला टोमणा मारत असत. सासूचा अडथळा होत असल्याचं लक्षात आल्यानंतर अल्पना आणि तिचा प्रियकर मनिष यांनी हत्येचा कट आखला.
२ जून २०१९ रोजी सुबोध देवी यांचा सापाने दंश घेतल्याने मृत्यू झाला. मृत्यूच्या दीड महिन्यांनी शंका आल्याने सासऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कुटुंबाने अल्पना आणि मनिष यांच्यातील संभाषणाची माहितीही दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी २ जूनला अल्पना आणि मनिष यांच्यात १२४ वेळा फोनवर बोलणं झालं. तर अल्पना आणि कृष्ण कुमार यांच्यात १९ कॉल झाले. यावेळी काही मेसेजही पाठवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पना, मनिष आणि त्यांचा मित्र कृष्ण कुमार सुबोध देवी यांच्या हत्येत सहभागी होते. सर्व आरोपींनी ४ जानेवारी २०२० ला अटक करण्यात आली असून तेव्हापासून जेलमध्ये आहेत.