एमपीएससी परीक्षेचा तारखा जाहीर; १७ संवर्गांत २९० पदांसाठी भरती
![Will give a scanned image of the answer sheet; Important decision of MPSC](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/MPSC.jpg)
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार २ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षा मेमध्ये होणार आहे. १७ संवर्गातील २९० पदांसाठी ही भरती होणार असल्याचे एमपीएससीने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यासाठी आज दुपारपासून अर्ज करता येणार आहेत.
कोरोनामुळे लांबलेल्या एमपीएससीच्या परीक्षा आता घेण्यात येणार आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार एमपीएससीने पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षांसाठी ५ ऑक्टोबरपासून उमेदवार अर्ज भरता येणार आहे. २५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, असे आयोगाने म्हटले आहे.