अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लसीचा बुस्टर डोस घेतला
वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. अमेरिकेतील लसीकरणाला गती आणि चालना देण्यासाठी आपण नागरिकांवर दबाव टाकणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. अमेरिकेतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असताना हावर्ड वाणिज्य स्कूलच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या वर्गात काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. असे असताना फायझर कंपनीने तोंडावाटे लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू केले असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा महत्त्वाचा बुस्टर डोस घेतला. कोरोनाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करणे आवश्यक आहे. याशिवाय बुस्टर डोसचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बायडेन यांनी यापूर्वी लसीचे २ डोस घेतले आहेत. त्यात त्यांना कोणताही साईड इफेक्ट झाला नव्हता. बुस्टर डोसचाही त्यांना चांगला अनुभव येऊ शकेल, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी अमेरिकेत २ लाख २० नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढला आणि अमेरिकेतील कोरोना आटोक्यात आला. ७८ वर्षांच्या बायडेन यांनी २१ डिसेंबरला पहिला आणि त्यानंतर ११ जानेवारीला दुसरा डोस घेतला होता. यानंतर सोमवारी त्यांनी बुस्टर डोस घेतला.