भाजपा आमदाराकडून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल
![BJP MLA insults female officer; Audio clip goes viral](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/sunil-kamble.jpg)
पुणे |
राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यानंतर आता पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिविगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महिला अधिकाऱ्यासोबत संभाषणची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार सुनील कांबळे यांनी ती जुनी असल्याची कबुलीच लोकसत्ता डॉट कॉमच्या प्रतिनिधीला दिली आहे. त्यामुळे आता सुनील कांबळे यांनी महिला अधिकाऱ्याला शिविगाळ केल्याचे स्पष्ट होत आहे.
ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्यास कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन लावला होता. त्यावर संबधीत महिला अधिकाऱ्यानी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे म्हटले होते. त्यावर कांबळे यांनी संबधित महिला अधिकाऱ्यास घाणरडया भाषेत शिवीगाळ केली. महिला अधिकारी आणि आमदार सुनील कांबळे यांच्यात जवळपास २ मिनिटाचे संभाषण झाले. त्यानंतर आता त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाला असून त्यावर आमदार सुनील कांबळे यांनी ती क्लिप जुनी असल्याची प्रतिक्रिया दिली. हा ऑडिओ जुना असल्याचे सांगत आमदार सुनील कांबळे यांनी अन्य कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र ही ऑडिओ क्लिप जुनी असल्याचे म्हणत सुनील कांबळे यांनी एक प्रकारे कबुलीच दिली आहे.
पुणे महापालिकेत सुनील कांबळे हे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. तर त्यांचे बंधू दिलीप कांबळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्य मंत्री राहिले आहेत. दिलीप कांबळे २०१४च्या निवडणुकीत कॅन्टोन्मेंट मधून निवडून आले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांचे भाऊ सुनील यांना पक्षाने संधी दिली आणि ते भरघोस मतांनी निवडून आले होते.
- आमदारकीचा माज घरी ठेवावा: रुपाली चाकणकर
“पुणे महापालिकेतील महिला पदाधिकाऱ्यासोबत जी भाषा भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी वापरली आहे.त्या विधानांचा आम्ही निषेध व्यक्त करतो, आम्ही सर्व संबधीत महिलेच्या पाठीशी आहोत. तसेच भाजपा आमदार सुनील कांबळे, आपण महापालिकेत सत्तेत असून आमदार आहात, त्यामुळे याचा माज घरी दाखवावा, पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांवर नाही,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.