breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

यूपीएससीच्या परीक्षेत शुभम कुमार देशात पहिला, महाराष्ट्रातील मृणाली जोशी ३६ वी

नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२० चा निकाल जाहीर झाला आहे. त्यात बिहारच्या कटिहार येथील शुभम कुमारने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे शुभमने महाराष्ट्रातील पुण्यात आयएएसच्या परीक्षेचा अभ्यास आणि तयारी केली होती. महाराष्ट्राच्या मृणाली जोशीने देशात ३६ वा तर विनायक नरवडेने ३७ वा क्रमांक पटकावला आहे. जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी यूपीएससीच्या परीक्षेत देशात अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.

यूपीएससीच्या परीक्षेत ७६१ उमेदवारांची निवड झाली असून त्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. बिहारमधील शुभम कुमारने या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तो बॉम्बे आयआयटीचा पदवीधर आहे. त्याने पुण्यात यूपीएससीचा अभ्यास केला होता. जागृती अवस्थीने यूपीएससीत मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. याशिवाय देशात ती दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिने भोपाळमधील मौलाना आझाद राष्ट्रीय औद्योगिक संस्थेतून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. अंकिता जैन हिने या परीक्षेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील मृणाली जोशी देशात ३६ वी आली आहे. तर विनायक नरवडे ३७ वा आला आहे.

या परीक्षेत एकूण ७६१ जणांची निवड झाली असून त्यात ५४५ पुरुष आणि २१६ महिला आहेत. गेल्या वर्षी ४ ऑक्टोंबरला यूपीएससीची पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी १० लाख ४० हजार ६० परीक्षार्थींनी अर्ज केले होते. मात्र ४ लाख ८२ हजार ७७० जणांनी ही परीक्षा दिली. त्यातून १० हजार ५६४ जणांची जानेवारी २०२१ मधील मुख्य परीक्षेसाठी निवड झाली होती. या परीक्षेतून २०५३ जण मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यातून ७६१ जणांची अंतिम निवड झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button