महापालिका शिक्षण समितीचा सभापती कोण? ; 9 जूलैला निर्णय
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2 जून 2017 रोजी शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर तब्बल सव्वा वर्षानंतर महासभेने शिक्षण समितीची स्थापना केली. या शिक्षण समितीचे पहिले सभापती कोण? याचा निर्णय 9 जूलै रोजी ठरणार आहे. दरम्यान, शिक्षण समिती सभापती पदासाठी गुरुवारी (दि.5) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्तीनंतर शिक्षम समितीची स्थापना करुन नऊ नगरसेवकांचा समावेश करण्यात आला. यामध्ये भाजपकडून सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांची शिक्षण समितीत निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी (दि.5) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. 9 जुलै रोजी दुपारी एक वाजता पालिका मुख्यालयातील महापौर मधुकरराव पवळे सभागृहात सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.