अक्षय कुमारला मातृशोक, अरुणा भाटिया यांचं निधन
![Maternal mourning for Akshay Kumar, death of Aruna Bhatia](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/akshay_kumar_with_mother.jpg)
अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. आजारपणामुळे त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आईला आयसीयूमध्ये हलवल्याचं कळताच अक्षय युकेहून तातडीने मुंबईला परतला.
‘ती माझं सर्वस्व होती आणि आज तिच्या जाण्याने मला अत्यंत दु:ख झाले आहे. माझी आई अरुणा भाटियाने आज सकाळी हे जग सोडलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या कठीण काळात तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो’, अशी पोस्ट अक्षयने लिहिली आहे.
आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त अक्षय युकेला गेला होता. मात्र आईची तब्येत बिघडल्याने सोमवारी तो मुंबईला परतला. मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित त्याने चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी आभार मानले होते. ‘माझ्या आईच्या प्रकृतीविषयी तुम्ही ज्याप्रकारे काळजी व्यक्त केली, त्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही फार कठीण वेळ आहे. तुमच्या प्रार्थनांची फार गरज आहे,’ असं त्यात अक्षयने लिहिलं होतं.
https://www.instagram.com/p/CTi9v8ToZ-d/?utm_source=ig_embed&ig_rid=4ee50227-02c0-484f-8e0e-1e04de72c2d1
२०१५ मध्ये ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय आईसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाला होता. “आई आणि तिच्या मुलाचे बंधन मजबूत असले तरी ते तितकेच नाजूक असते. आम्हा दोघांमध्ये कोणतीच गोष्ट येऊ शकत नाही. आमच्यात कितीही मैलांचं अंतर असलं, दररोज संपर्कात राहू शकलो नसलो तरी तिच्याशिवाय माझं अस्तित्व काहीच नाही, मी कोणीही नाही”, असं तो म्हणाला होता.
काही वर्षांपूर्वी अरुणा यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अरुणा या निर्मातीसुद्धा होत्या. बॉलिवूडच्या काही चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. यामध्ये ‘हॉलिडे’, ‘रुस्तम’ या चित्रपटांचा समावेश आहे.