विदर्भाला पावसाने झोडपलं, अमरावतीत नदीला पूर
![Vidarbha was lashed by rains, Amravati river flooded](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/amravati.jpg)
अमरावती – विदर्भात अनेक जिल्ह्यांत रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. अमरावतीत रात्रीपासून सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत कायम आहे. भातकुली येथील पेढी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आज सकाळी अमरावती ते भातकुली या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. सुरक्षेच्यादृष्टीने भातकुली पोलिस येथे तैनात होते.
बडनेरा नवीन वस्तीत यवतमाळ रोडवर झिरीसमोरचा मोठा पूल ओलांडताच डाव्या बाजूला असलेल्या सुमारे 25 घरांमध्ये कंबरेएवढे पाणी शिरले. पहाटे तीन वाजतापासून हाहाकार माजला होता. भाजपाचे शहर सचिव किशोर जाधव यांचेही घर गुडघाभर पाण्यात होते. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, नगरसेविका अर्चना धामणे पहाटे 3 वाजता घटनास्थळावर पोहोचले. मनपाचे उपायुक्त पवार व रेस्क्यू पथक तात्काळ पोहोचले. सकाळी 6 पर्यंत पाण्याचा निचरा करण्यास यश आलेले नाही. मोठ्या प्रमाणात साप देखील वाहून आल्याने व घरात शिरल्याने लोक घाबरले होते. तसेच जिल्ह्यातील अनेक भागात देखील पावसाचा जोर कायम असून खोलगट भागात पाणी शिरले आहे.
दरम्यान, विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात रात्रीपासूनच विजांच्या कडकडाटासह रात्रापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सकाळी देखील पावासाचा जोर कायम आहे.