मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला; वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार!
साहित्य विश्व: "मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया" च्या सहयोगाने उत्सव

मुंबई | वाचनाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया” च्या सहयोगाने दि.५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू.), तिसरा मजला, शारदा मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटनानंतर “लेखक तुमच्या भेटीला” आणि “एका संगीतकाराची मुशाफिरी” या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, रावेतच्या विद्यार्थ्यांचा मॅप्रो कंपनीला औद्योगिक भेट
तर दि. ६ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन, व्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत. तसेच “शब्दव्रती” या कार्यक्रमात निवडक मराठी कवयित्रींच्या कविता सादर केल्या जातील. याशिवाय, ग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधिक गौरव करून ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.
मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहेत. दोन दिवसीय ग्रंथोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून मुंबईकर नागरिक, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई शहर शशिकांत काकड यांनी केले आहे.