मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत?; मंदिरे उघडण्यावरुन भाजपचा सवाल
![Under whose pressure is the Chief Minister working ?; BJP's question on opening temples](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Uddhav-Thackeray-7-1-1.jpg)
मुंबई |
महाराष्ट्रात करोना निर्बंधामध्ये सूट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. लोकलपासून, दुकाने, हॉटेल यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दरम्यान, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीने तर्फे सोमवारपासून राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
राज्यात नाशिक, पुणे, पंढरपूर आणि नागपूर येथे भाजपातर्फे मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारला मंदिरे उघडा अन्यथा आम्ही नियम तोडू असे म्हटले आहे. “एकीकडे आज श्री कृष्ण जन्माष्टमी असल्याने संपूर्ण देशामध्ये मंदिरे उघडण्यात आली आहेत. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढे अधार्मिक का झाले आहेत ते कुणाला कळत नाहीये. त्यांचा धर्म कुठे गेला आहे हेही कळत नाही. कुणाच्या दबावाखाली ते काम करत आहेत? कोणाला खुश करण्यासाठी ते काम करत आहेत हे आम्हाला कळत नाही. आता जर सरकारने ऐकलं नाही तर आम्ही नियम तोडणार आणि मंदिरे उघडणार. सरकारला कारावाई करायची ती त्यांनी करावी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक देखील काढण्यात आलं होतं. त्यामध्ये “ठाकरे सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करुन ठेवली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळित केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरु आहेत. म्हणुनच देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे,” असे म्हटले होते.