धारावीत सिलिंडरचा स्फोट 14 जखमी, 2 जण गंभीर
![14 injured, 2 seriously injured in Dharavi cylinder explosion](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/gas-spot.jpeg)
मुंबई- मुंबईच्या धारावी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना आज घडली. या स्फोटात 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघा जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते आहे.
धारावीतील शाहू नगरमध्ये मुबारक हॉटेलसमोर असलेल्या एका घरात आज दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटाची भीषणता जास्त असल्याने यामध्ये तब्बल 14 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी या स्फोटात जखमी झालेल्या 14 जणांना तात्काळ उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. यातील दोघे जण 70 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन फायर इंजिन, एक जंबो वॉटर टँकरच्या सहाय्याने काही वेळातच या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले.