विधिमंडळाच्या दोन समित्या नाशिकच्या दौऱ्यावर!
नाशिक – विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण आणि पंचायत राज या दोन समित्या नाशिकच्या दौऱ्यावर येताहेत. अनुसूचित जमाती कल्याण समिती २३ ते २५ ऑगस्टला, तर पंचायत राज समिती २६ ते २८ ऑगस्टला येत आहे. त्यामुळे ग्रामविकास यंत्रणेला आठवडाभर साक्ष द्यावी लागणार आहे. एकाच जिल्ह्यात दोन समित्या येत असल्याने एका समितीचे कार्यक्रम पुढे जाईल, अशी चिन्हे दिसत होती. पण दोन्ही समिती दौऱ्यात एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला.
ग्रामविकास यंत्रणेची आठवडाभर साक्ष
शहापूरचे आमदार दौलत दरोडा अनुसूचित जमाती समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती सोमवारी (ता. २३) नाशिकमध्ये येत आहे. पहिल्या दिवशी दुपारनंतर जिल्हा परिषदमध्ये साक्ष होईल. दुसऱ्या दिवशी जिल्हाभर भेट देऊन आढावा घेतला जाईल. तसेच, तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात साक्ष होईल. मेहकरचे आमदार डॉ. संजय रामुलकर पंचायत राज समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत निफाडचे आमदार दिलीप बनकर आणि आमदार किशोर दराडे यांचा समावेश आहे. मात्र, अनुसूचित कल्याण समितीत जिल्ह्यातील एकाही आमदारांचा समावेश नाही.
पंचायत राज समिती गुरुवारी सकाळी साडेदहा ते अकरा या वेळेत सरकारी विश्रामगृहात जिल्ह्यातील आमदारांशी चर्चा करेल. त्यानंतर अर्धा तास येथेच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर सकाळी साडेअकराला जिल्हा परिषदेच्या सभागृहात २०१६-१७ च्या लेखा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची साक्ष होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या भेटी दिल्या जाणाऱ्या पंचायत समित्यांची निश्चिती केली जाईल. शुक्रवारी (ता. २७) सकाळी दहापासून पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळांना भेट देण्यात येईल आणि गटविकास अधिकाऱ्यांची साक्ष होईल. शनिवारी (ता. २८) सकाळी अकरापासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाबाबत श्रीमती बनसोड यांची साक्ष होईल.