३२ दिवसांनंतर थोडा दिलासा; डिझेल २० पैशांनी स्वस्त
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात अलिकडे घसरण झाली असली तरी भारतात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु ३२ दिवसांनंतर आज भारतीय तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात २० पैसे लिटर एवढी कपात केली आहे. यामुळे सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यात सामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. असे असताना तेल कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या नव्या दरांमध्ये डिझेल २० पैसे लिटरने स्वस्त झाले आहे. मात्र पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आज तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या इंधन दरानुसार मुंबईत पेट्रोल १०७ रुपये ८३ पैसे लिटर आणि डिझेल ९७ रुपये २४ पैसे लिटर आहे. तर दिल्लीत पेट्रोल १०१ रुपये ८४ पैसे आणि डिझेल ८९ रुपये ६७ पैसे लिटर आहे. परभणीत पेट्रोल १०८ रुपये ८४ पैसे लिटर आणि डिझेल ९६ रुपये ७६ पैसे लिटर आहे.