“अधिकाऱ्यांवर चिखल टाकणारे तुमच्याच पक्षाचे…”, गडकरींच्या ‘त्या’ पत्रावरून भास्कर जाधवांचा हल्लाबोल
![Bhaskar Jadhav's attack on Gadkari's 'that' letter](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Bhaskar-Jadhav-Gadkari-1.jpeg)
मुंबई |
राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याची तक्रार केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली होती. त्यावरुनच आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी गडकरींवर टीका केली आहे. अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतणारेही तुमच्याच पक्षाचे होते, असं म्हणत नितेश राणेंनी अधिकाऱ्यांवर चिखल ओतल्याच्या घटनेची आठवणही करुन दिली. जाधव म्हणाले, मला असं वाटतं की गडकरी आणि उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना आहे.
गडकरींना अशा प्रकारचं पत्र लिहिण्याचा अधिकार आहे. हीच गोष्ट ते फोनवरही बोलू शकले असते. पण मग हे पत्र माध्यमांसमोर का आलं? तुम्हाला खरोखरच अडथळा येत आहे म्हणून मार्ग काढायचा आहे की संधी मिळेल तिथे शिवसेनेला ठोकायचं आहे? मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की ज्यांनी सिंधुदुर्गामध्ये अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतला ते आमदार तुमच्याच पक्षाचे आहेत. शिवसेनेने असं काही केलेलं मला तरी आठवत नाही. त्यामुळे हे पत्र माध्यमांसमोर आणण्याऐवजी गडकरींनी मुख्यमंत्र्यांशी याबद्दल बोलणं केलं असतं तर त्यांच्याविषयीची आदराची भावना वाढली असती.
मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याची तक्रार गडकरी यांनी केली होती. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे, यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली असल्याबद्दल तीव्र संताप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला होता. एवढंच नाही ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत आहे अशी स्पष्ट भूमिका गडकरी यांनी घेतली होती. अर्धवट रस्त्यांची कामे ही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल अशी भिती गडकरी यांनी व्यक्त केली होती. कामात अडथळे आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल असा गंभीर इशारा या पत्राद्वारे गडकरी यांनी दिला होता.