’जायका’च्या निविदेला पुन्हा आठवड्याची मुदतवाढ
![Jaika's tender extended for another week](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Mula-Mutha.jpg)
पुणे | राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत शहरातील मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या (जायका) निविदा प्रक्रीयेला पुन्हा एकदा आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत शहरातील मुळा-मुठा नद्यामध्ये येणारे मैलापाणी शुद्ध करण्यासाठी जपान येथील जायका कंपनीच्या सहकार्याने प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 2015 मध्ये जायका कंपनीने 990 कोटी 26 लाख रुपयांचे कर्ज नाममात्र व्याजदराने केंद्र सरकारच्या माध्यमातून पालिकेला उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. यापैकी 85 टक्के रक्कम अर्थात 841 कोटी 72 लाख रुपये अनुदानाच्या हिश्श्यापोटी महापालिकेला मिळणार आहे. उर्वरीत रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे.
दीर्घकालिन काम चालणा-या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अद्यापही कागदावरच आहे. यामुळे याचा खर्च वाढून 1511 कोटीवर गेला आहे. महापालिका प्रशासनाने ठेकेदारांच्या सोईने नियमात केलेले बदल, तांत्रिक चुका अशा एक हजारपेक्षा चुका प्रस्तावात होत्या. त्यामुळे प्रकल्पास उशीर झाला. या चुका दुरुस्त झाल्यानंतर या कामासाठी 15 कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यांना निविदा भरण्यासाठी 17 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. त्यानंतर तांत्रिक छाननी समिती स्थापन करून निविदांची छाननी प्रक्रिया केली जाईल.
दरम्यान, युरोपात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे प्रस्ताव सादर करण्यास उशिर होणार असल्याने सर्व 15 कंपन्यांनी चार आठवडे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. महापालिकेने चार आठवड्यास नकार देत दोन आठवड्याची मुदत देण्याची तयारी दर्शविली. पण ‘जायका’कडून एक आठवडा मुदतवाढ मिळेल असे स्पष्ट केले आहे.
अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, “जायका प्रकल्पासाठी निविदा भरण्यासाठी 17 ऑगस्ट शेवटची तारीख होती. पण, युरोपात कोरोनाची साथ वाढल्याने सर्व 15 कंपन्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आजच एका आठवड्याची मुदत वाढविण्याचा निर्णय जायकाने घेतला आहे.“