घरीच बनवलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेताना अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू
![An accident during the trial of a home-made helicopter; The young man died on the spot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/IMG_20210811_162335.jpg)
यवतमाळ – येथील २५ वर्षाच्या एका तरुणाने घरीच बनवलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेताना अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टरचा फॅन तुटून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. महागाव तालुक्यातील फुलसावंगी इथे ही धक्कादायक घटना घडली. शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे.
इब्राहिम शेखने घरात चक्क हेलिकॉप्टर बनवलं होतं. या हेलिकॉप्टरची ट्रायल सुरु होती. त्यावेळी आजूबाजूला इब्राहिमचे मित्रही होते. इब्राहिमने हेलिकॉप्टर सुरु केलं. त्यावेळी हेलिकॉप्टरच्या पंख्यांनी वेग घेतला. हेलिकॉप्टर हवेत झेपावणार असं वाटत असतानाच अपघात झाला. हेलिकॉप्टरचे पंखे तुटले. तुटलेले पंखे थेट पायलट केबिनवर जोरदार आदळले. कुणालाही काही कळण्यापूर्वीच या पंख्यांनी इब्राहिमवर मोठा आघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. फॅन तुटून इब्राहिमच्या डोक्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. इब्राहिमचा मृत्यू झाला.
इब्राहिमने 3 इडियट्समधल्या रँचोप्रमाणे स्वत: काहीतरी बनवण्याचं स्वप्न पाहिलं. ते स्वप्नही सत्यात उतरलं. त्याने हेलिकॉप्टर बनवलं. मात्र तेच स्वप्न त्यच्या जीवावर बेतले. इब्राहिमच्या मृत्यूने एक कर्तबगार, प्रयोगशील तरुण हरपला. त्यामुळे फुलसावंगीसह संपूर्ण महागाव तालुक्यात शोक व्यक्त होत आहे.