कर्नाटकात डेल्टापाठोपाठ आढळला कोरोनाचा नवा ‘एटा’ व्हेरिएंट
![Worrying! Infection of the delta variant even those vaccinated; In front of information from the study of ICMR](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/delta-plus-variant-2.jpg)
बंगळुरु – देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटची भीती कायम असताना आता कर्नाटक राज्यात कोरोनाचे नवे रूप समोर आले आहे. कर्नाटकच्या मंगळुरुमध्ये एटा कोरोना व्हेरिएंट आढळला आहे. राज्यात या व्हेरिएंटचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मंगळुरू शहरातील एका नागरिकाला एटा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी ही व्यक्ती कतारला गेली होती. तिथून आल्यानंतर त्याच्यात या नव्या व्हेरिएंटची लक्षणे दिसून आली आहेत. वास्तविकता एटा संसर्गाचे हे पहिले प्रकरण नसून गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात कर्नाटकात एटाचा रुग्ण सापडला होता, अशी माहिती कर्नाटकचे नोडल अधिकारी आणि कोरोना होल जिनोम सिक्वेन्सीग समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. रवी यांनी दिली. खरे तर या नव्या व्हेरिएंटचा तितकासा धोका नाही. तसे असते तर आतापर्यंत याचे अनेक रुग्ण आढळले असते असे तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे. हा व्हेरिएंट आजही इओटा, कप्पा आणि लेम्बडासारखा व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट आहे. त्यामुळे त्याची चिंता बाळगण्याची गरज नाही.