डिजिटल पेमेंटला आणखी चालना मिळणार, नरेंद्र मोदींच्या हस्ते ई रुपीचे उद्घाटन
![Digital payments will get another boost, the inauguration of e-rupee at the hands of Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/20210802_175041.jpg)
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या ‘ई-रुपी’चे सोमवारी उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की, देशात डिजिटल पेमेंट आणि थेट बँक ट्रान्सफरला चालना देण्यासाठी ई-रुपी व्हाऊचर महत्वाची भूमिका बजावेल. यामुळे सर्वांना नेमके पारदर्शी आणि अडथळ्याविना मोफत पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे.
मोदी म्हणाले की, 21व्या शतकात भारत कशा पद्धतीने पुढे चालला आहे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने लोकांशी कसा जोडला जात आहे, याचे ई-रुपी सेवा हे एक उदाहरण आहे. देशातील नागरिक ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना ही सेवा सुरु झाली असून याचा मला खूप आनंद होत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
दरम्यान, ई-रुपी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाउचर असून हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या युपीआय प्लटफॉर्मवर वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने ई-रुपी विकसित केले आहे. ई-आरयूपीआय सेवेचे प्रायोजक लाभार्थी आणि सेवा प्रदात्याशी कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने जोडते. ई-रुपी हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस साधन आहे. हे एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे, जे लाभार्थ्यांच्या मोबाइलवर वितरित केले जाते. या वन टाईम पेमेंट यंत्रणेचे वापरकर्ते कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंग प्रवेशाशिवाय सर्व्हिस प्रोव्हाडर व्हाउचर रिडीम करू शकतील. ई-रुपी हे देखील सुनिश्चित करते की व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हिस प्रोव्हाडरला पैसे दिले जातील.