महापालिकेच्या अनेक मिळकती पडून, मग प्रभाग कार्यालय भाड्याच्या जागेत!
![Many municipal properties fall, then the ward office is in rented space!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/59e83a57-4366-4bb4-94bd-61784396a16a.jpg)
- स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
- फ- प्रभाग कार्यालयासाठी महापौरांनी लक्ष घालण्याची विनंती
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे फ- प्रभाग कार्यालय सध्या भाडेतत्त्वावरील जागेत आहे. त्यामुळे या कार्यालयाचे भाडे भरण्यापोटी महापालिकेचे लाखो रुपये खर्ची पडतात. महानगरपालिकेच्या अनेक इमारती बांधून, धूळखात पडून असल्याची वस्तुस्थिती आहे, असे असताना फ-प्रभाग कार्यालय मात्र भाड्याच्या जागेत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मिळकतीत फ- प्रभाग कार्यालय उभारण्याची विनंती स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली.महापालिकेच्या फ प्रभागामध्ये स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, जलनि:सारण, वैद्यकीय आणि आरोग्य विषयक प्रश्नांबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली.
यावेळी विधी समिती अध्यक्षा स्वीनल म्हेत्रे, क्रीडा कला साहित्य व सास्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, फ- प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसदस्य प्रविण भालेकर, सचिन चिखले, नगरसदस्या सुमन पवळे, पौर्णिमा सोनवणे, संगिता ताम्हाणे, योगिता नागरगोजे, साधना मळेकर, कमल घोलप, स्वीकृत नगरसदस्य संतोष मोरे यांनी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध प्रश्नांबाबत समस्या महापौरांसमोर मांडल्या.
यावेळी दिनेश यादव म्हणाले की, महापौर माई ढोरे यांनी प्रभाग अंतर्गत सुरू केलेल्या बैठकांमुळे अधिकारी आणि सदस्य यांच्यातील समन्वय वाढला आहे. या बैठकांमधून, विचारांच्या आदान-प्रदानातून प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मदत होते. महापौरांचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. यामधून चांगल्या पद्धतीने, चर्चात्मक रितीने प्रभागातील समस्या मांडल्या जात आहेत. फ प्रभाग कार्यालय ज्या इमारतीमध्ये आहे. तिथे फ प्रभाग कार्यालयाने प्रशासकीय कामकाजासाठी जागा भाडेतत्त्वावर घेतलेली आहे.
भाडे वाचवा अन् विकासकामांवर खर्च करावा…
सध्या महापालिकेच्या अनेक इमारती, मिळकती बांधून अक्षरशः धूळ खात पडून आहेत. आणि आम्ही मात्र या भाडेतत्वावरील जागेत प्रशासकीय कारभाराचा डोलारा सांभाळत आहोत. हे अत्यंत दूराभास निर्माण करणारे चित्र आहे. एकीकडे कोट्यवधींच्या मिळकती आपण धूळ खात पडून ठेवल्या आहेत आणि दुसरीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून भाडेतत्त्वावरील जागेत प्रशासकीय काम करीत आहोत. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. याकडे महापौरांनी लक्ष द्यावे हा मुद्दा प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन प्रभागाचे स्थलांतर महापालिकेचा मालकीहक्क असलेल्या जागेत करावे जेणेकरून भाड्यापोटी खर्च होणारी रक्कम विकास कामांसाठी वापरता येईल, अशी मागणी दिनेश यादव यांनी यावेळी महापौरांकडे केली आहे.