पुणे-नाशिक प्रवास होणार सुस्साट; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण
![Pune-Nashik journey will be smooth; Narayangaon bypass work completed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/20210717_152914.jpg)
पुणे – नारायणगाव बायपासचं काम पूर्ण झाल्याने आता पुणे – नाशिक प्रवास सुस्साट होणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. नारायणगावातून जाणारा पुणे बायपास हा पुणे ते नाशिकदरम्यानचा प्रवास सुखकर करेल, असं नितीन गडकरी ट्विट करत म्हणालेत.
पाच वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्ग नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. तसेच खेड ते सिन्नरदरम्यानच्या नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याचं काम 2016 ला सुरू झाले. सुमारे पाच किलोमीटर लांब आणि साठ मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम 2018मध्ये भूसंपादनाच्या कारणास्तव रखडले होते. त्यानंतर आता या बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण झाले असून, पुण्यातून थेट नाशिक आणि मुंबईला पोहोचणे आता सहज शक्य होणार आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.
नितीन गडकरींच्या कामाचा वेग हा भन्नाट
नितीन गडकरींच्या कामाचा वेग हा भन्नाट आहे. पायाभूत सुविधांमधील मोठ्या बदलांमुळे भारतातील रस्तेही युरोप आणि अमेरिकेसारखे होतील, असंही गडकरींनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्यही प्रचंड चर्चेत आलं होतं. तसेच दिल्ली-मुंबईमधील रस्त्याचे अंतर फक्त 12 तासांचे होणार असून, राज्यातील समृद्धी महामार्गाने मुंबई-नागपूरमधील अंतरही कमी होईल, असंही त्यांनी सांगितलं होतं.