संसदेच्या अधिवेशनापूर्वी 18 जुलैला सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली – केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशन एक दिवसआधी म्हणजे 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तसेच त्यानंतर भाजपाची कार्यकारी बैठक याच दिवशी होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु होणार असून कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतरचे हे पहिले अधिवेशन होत आहे. पावसाळी अधिवेशन 19 दिवस चालणार असून ते 13 ऑगस्टला संपणार आहे.
जवळपास एका महिन्यापर्यंत चालणाऱ्या या पावसाळी सत्रादरम्यान 20 बैठका होण्याची शक्यता आहेत. सामान्यत: संसदेचं पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होते आणि स्वातंत्र्यदिनाच्या आधी समाप्त होते. सत्राच्या दरम्यान संसद परिसरात कोरोनाशी निगडीत सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलचं पालन केलं जाईल. या अधिवेशनाच्या दरम्यान संसद परिसरात प्रवेश करणाऱ्यांनी कोरोना लशीचा कमीतकमी एक डोस घेतलेला असणे अनिवार्य असणार आहे.