भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटले, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
![The speeding car lost control and both died on the spot in the accident](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/n298064884a5462bba225.jpg)
सांगली – कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चारजण जखमी आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील बोरगावनजीक हा अपघात झाला असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. शुभम सयाजी सूर्यवंशी (वय 24), अक्षय सुरेश गायकवाड (वय 23) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत
सांगलीतील बेलवडे येथून सहा तरुण फिरायला गेले होते. तिथून परतत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार उलटून रस्त्याकडील नाल्यावरून पलिकडे उसाच्या शेतात 20 फूट फेकली गेली.
अपघाताची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना अॅम्ब्युलन्समधून इस्लामपूर येथे आणण्यात आले. येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने दीपक, हरी सूर्यवंशी व अक्षय गायकवाड यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी नेत असताना दोघांचा वाटेतच मृत्यू झाला.
दीपक जगन्नाथ सूर्यवंशी (वय 26), अक्षय विठ्ठल सूर्यवंशी (वय 22), विकास भार्गव सूर्यवंशी (वय 25), हरी आनंदा सूर्यवंशी (वय 24) अशी या जखमींची नावे आहेत. त्यातील हरी सूर्यवंशी व कारचालक दीपक सूर्यवंशी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.