नाशिकच्या चलनी नोटांच्या प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब
![Five lakh rupees notes disappear from Nashik's currency note press](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/money-news_2017084424.jpg)
नाशिक – नाशिकमधील भारतीय चलनी नोटांची छपाई केल्या जाणाऱ्या प्रेसमधून म्हणजेच टांकसाळीतून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यापूर्वी ही घटना उघड झाली होती. मात्र देशातील कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही पाच लाखांच्या नोटा गायब झाल्याने मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
काल सोमवारी या मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. देशात नोटबंदी जाहीर केल्यानंतर याच प्रेसमधून दिवसरात्र छपाई करून देशातील नागरिकांना नवीन चलनी नोटा पुरविण्यात आल्या होत्या. नोट प्रशासनाने या प्रकरणाची अंतर्गत गोपनीय चौकशी करूनही पाच लाखांचा तपास लागला नसल्याची माहिती समोर येत आहे. यामागे मोठा घोटाळा असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर व पाचशेच्या नोटांची छपाई होते. नाशिक प्रेसमध्ये दिवसाला १५ ते १८ दशलक्ष नोटांची छपाई होते. नाशिक प्रेसमधील नोटा ट्रक आणि रेल्वे वॅगनने रिझर्व्ह बँकेच्या देशातील १८ केंद्रांमध्ये जातात. दरम्यान, ५०० रुपयांच्या नोटांचे १० बंडल गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.