लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया गतिमान; आयोगाची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार
![Accelerate the recruitment process of the Public Service Commission; The posts of the commission will be filled till July 31](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/ajit-pawar-news.jpg)
- आयोगाची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार; ईएसबीसी वर्गातील उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ
मुंबई |
राज्य लोकसेवा आयोगावरील रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरल्या जातील. लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रि या गतिमान करण्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिकदृष्टय़ा मागास (ईएसबीसी) वर्गातील उमेदवारांचे वयोमर्यादा ४३ वर्षे करणे तसेच ११ महिन्यांकरिता झालेल्या नियुक्त्या कायम करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत के ली.
लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळालेल्या स्वप्निल लोणकर या युवकाच्या आत्महत्येचे पडसाद सभागृहात उमटले. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्निल लोणकर या पुण्यातील विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची गंभीर बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. तर आणखी ४३० उमेदवारांनी अशाच प्रकारे आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यावर लोणकर यांच्या आत्महत्येची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. लोणकर कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये ज्याप्रमाणे वर्ग तीन आणि चारची पदे विभागास भरण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे वर्ग एकची व अन्य पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सुरू करण्याबाबत सरकार प्रयत्नशील असल्याची माहितीही पवार यांनी दिली.
- शैक्षणिक आणि सामाजिकदृष्टय़ा विद्यार्थ्यांना दिलासा
२०१४मध्ये उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी मराठा समाजाला (ईएसबीसी) आरक्षणानुसार नियुक्त्या तसेच स्थगिती आल्यानंतर ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी के ली. मराठा आरक्षणाचे न्यायालयीन प्रकरण, त्यावर आलेली स्थगिती व अंतिम निकाल, तसेच करोनामुळे अनेक नोकर भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. त्यातील अनेक एसईबीसी उमेदवारांचे वय विहित मर्यादेपलिकडे गेले होते, शिवाय शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण रद्दबातल झाल्यामुळेही अनेक विद्यार्थी वयोमर्यादा ओलांडणार होते.
अशा उमेदवारांना वयोमर्यादा ४३ वर्षे करण्याचा तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातील सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर निर्बंध येण्यापूर्वी या प्रवर्गातून निवडीसाठी शिफारस झालेल्या परंतु, अद्याप नियुक्त्या न मिळालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञांचे कायदेशीर मत मागवण्यात आले असून, त्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. अद्याप निवड यादी जाहीर न झालेल्या नोकर भरती प्रक्रियांमधील शैक्षणिक आणि सामाजिकदृटय़ा मागास उमेदवारांना आर्थिकदृटय़ा मागास किंवा खुल्या प्रवर्गातून पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून उमेदवारांनी निवडलेल्या पर्यायानुसार या निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना राज्य लोकसेवा आयोग तसेच अन्य निवड मंडळांना देण्यात आल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
- दरेकर यांची टीका
स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित करून त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याची मागणी केली. स्वप्निलची आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.