Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

अयोध्येतील राम जन्मभूमी जमीन घोटाळा हा श्रीमंतांचा अपराध; खासदार संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

मुंबई |

“आपले पंतप्रधान मोदी यांनी काळा पैसा परदेशातून परत आणण्याचे वचन दिले व लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. पैसा आलाच नाही, उलट धनिकच येथे लूटमार करून परदेशी जाऊन स्थायिक होत आहेत,” असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी देशातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधून घेत राम जन्मभूमी जमीन खरेदी घोटाळा झाल्याच्या आरोपांवरही भाष्य केलं आहे. हा घोटाळा करणाऱ्यांच्या मागे सत्ताधारी उभे असं असल्याचं सांगत राऊतांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

देशातील वाढलेल्या आर्थिक गुन्हेगारीवर शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून भाष्य केलं आहे. यात राम मंदिर उभारणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावरही राऊत यांनी टीका केली. “गुन्हेगारी का वाढते यावर विविध मतांतरे आहेत. दारिद्र्यामुळे गुन्हेगारी वाढते असं मानलं जाते. ते खरं असेलही, पण फक्त दारिद्र्यामुळेच गुन्हेगारी वाढते असं नाही. अगदी पूर्वापारही श्रीमंतांनी, राजे-महाराजांनी, राजकारण्यांनी लुटमार केली व फसवणूक करून स्वतःची श्रीमंती वाढवली. सध्या ज्या ‘चोरकथा’ अत्यंत रंजक पद्धतीने समोर येत आहेत त्या चोरकथांचे नायक किंवा खलनायक श्रीमंत आहेत. अत्याचार, हिंसाचार, फसवणूक इत्यादी गुन्हे फक्त गरीबच करतात असे नव्हे. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, हर्षद मेहता यांना गरीब मानायचे तर श्रीमंतीची व्याख्याच बदलावी लागेल. आपले पंतप्रधान मोदी यांनी काळा पैसा परदेशातून परत आणण्याचे वचन दिले व लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. पैसा आलाच नाही, उलट धनिकच येथे लूटमार करून परदेशी जाऊन स्थायिक होत आहेत. पाकिस्तानचे एकेकाळचे अध्यक्ष अयुब खान यांनी साठेबाजी करणाऱ्य़ा दोन व्यापाऱ्य़ाना फाशी दिले. ताबडतोब सर्व व्यापाऱ्यांनी आपण होऊन आपल्याकडील मालाचा साठा जाहीर केला. रशियाचे एकेकाळचे अध्यक्ष क्रुश्चेव्ह यांनी आपले पाकीट हरवले असल्याचे जाहीर करताक्षणीच त्यांच्या पायाजवळ हजारो पाकिटे येऊन पडली. आपल्याकडे असे कधी घडले आहे काय?,” असा सवाल करत राऊतांनी काळ्या पैशांवरून सरकारला टोला लगावला.

“राजकारणात पैसा घुसला. त्या पैशाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले. भ्रष्ट राजकारणी, भ्रष्ट उद्योगपती व गुन्हेगार यांच्या हातमिळवणीतून जग चालले आहे. ज्यांच्या जीवनात सदैव भाद्रपद फुललेला असतो अशा अमंगल लोकांनीच हे जग भरलेलं आहे, असं कोणीतरी लिहून ठेवलेच आहे. कुख्यात चार्ल्स शोभराज म्हणतो, ‘सर्वत्र संख्यात्मक वाढ झाली आहे, गुणात्मक वाढ कोठेच दिसत नाही.’ चार्ल्स शोभराजने हिंदुस्थानात असताना काढलेले हे उद्गार आहेत. ‘अनाडी’ चित्रपटात राज कपूर हा प्रामाणिक माणूस मोतीलाल या धनवान उद्योगपतीचे रस्त्यात मिळालेले पाकीट परत करतो. मोतीलाल त्याच्या त्या प्रामाणिकपणावर अतिशय प्रसन्न होऊन त्याला एका उपाहारगृहात घेऊन जातो. तेथे अनेक लोक खात-पीत, नृत्य करून आनंदोत्सव साजरा करीत असतात. ‘अनाडी’ राज कपूर मोतीलालना विचारतो, ”कौन है ये लोग?” मोतीलाल मोठ्या मार्मिक शब्दांत उत्तर देतो, ”ये वो लोग है, जिन्होंने रास्ते पर मिला हुआ बटवा वापस नहीं किया!” ‘श्री ४२०’ या आपल्या चित्रपटात पैशांसाठी हपापलेल्या व माणुसकी गुंडाळून टाकलेल्या नीच लोकांकडे पाहत राज कपूर म्हणतो, ‘सुना था इन्सान पहले बंदर था, मगर पैसों के लालच ने उसे कुत्ता बना दिया!” लालच, हवस कोणात नाही? सगळय़ांत आहे, पण ती गुन्हेगारीतून श्रीमंतीकडे वळलेल्या लोकांत जास्त आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाला आता सांगावे लागले, करोना संकट संपेपर्यंत मजुरांच्या घरातील चूल सुरू ठेवा! कोरोना काळातील निर्बंधांमुळे लोकांच्या चुली विझल्या आहेत. याचे भान कोणालाच नसावे हे चिंताजनक आहे,” अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.

“मेहुल चोक्सी या डायमंड व्यापाऱ्य़ाने पंजाब नॅशनल बँकेचे १४ हजार कोटी रुपये बुडवले. हे चोक्सी महाशय सध्या ‘बार्बाडोस’ देशाच्या तुरुंगात आहेत. काही कोटी रुपये गुंतवणूक करून चोक्सी याने ‘ऑण्टिग्वा’ देशाचे नागरिकत्व घेतले. पैशाच्या ताकदीवर गुन्हेगार एखाद्या देशाचे नागरिकत्व विकत घेतात व तेथेच स्थायिक होतात. हे श्रीमंत गुन्हेगारांचे खेळ आहेत. जगात शंभरावर देश असे आहेत जे रोख पैसे घेऊन नागरिकत्व बहाल करतात. त्यात युरोप, आफ्रिकेतील देशही आहेत. त्यातील अनेक देशांची लोकसंख्या ५० हजार इतकीही नाही. आर्थिक गुन्हे करून परागंदा झालेल्या श्रीमंतांसाठी हे देश म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नाहीत. गरीबाने गुन्हा केला तर तो नरकात म्हणजे तुरुंगात जातो. पैसेवाल्याने अपराध केला तर तो अशा प्रकारे ‘स्वर्गात’ जातो. देशाच्या संसदेत किमान ७५ सदस्य असे आहेत, ज्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांचे किमान पाच ते दहा हजार कोटी बुडवले आहेत. गुन्हेगारी कोण वाढवतो व कोण पोसतो यावर हा उतारा आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button