आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर गजाआड
मुंबई – भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर बुधवारी दगडफेक झाली होती. सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आहे.
गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या युवकाचं नाव अमित सुरवसे असं आहे. अमित सुरवसे याला सोलापुरातील दहिटणे परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेले दोन दिवस अमित फरार होता. मात्र, आज अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसबीआय कॉलनी, मड्डे वस्ती भागात बैठकीसाठी आले असता अज्ञात युवकाने गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती. यानंतर पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधताना या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती.
यावेळी माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले होते की, माझा आवाज दाबण्यासाठी माझ्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असेल. उद्या मला गोळ्या जरी घातल्या तरी मी विचारांपासून मागे हटणार नाही. या ठिकाणी माझी कोणाशी ओळख नाही, शत्रूत्व नाही. ज्यांनी कोणी केलं असेल किंवा ज्यांना कोणी करायला लावलं असेल त्यांना राज्यातील लोकं जाणत आहेत.





