पुण्यातील लंकड रिअॅलिटी फर्म्सच्या मालकाला अटक, ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार
![Owner of Lankad reality firm in Pune arrested, depositors cheated](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/jpg-7.jpg)
पुणे | पुण्यातील लंकड रिअॅलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल लंकड रिअॅलिटी फर्म्सचा मालक अमित लंकडला अटक केली. पुण्यात डीएसकेनंतर लंकड ग्रुपकडून फसवणुकीचा मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.गुंतवलेल्या रकमेवर १५ टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते. मात्र परतावा न दिल्याने गुंतवणूकदारांनी पुण्यातील येरवडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या तपासानंतर गुंतवणूकदारांची थकित रक्कम तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आणखी काही कोटींचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एमपीआयडी कायद्या अंतर्गत अमित लंकडवर कारवाई करण्यात आली आहे. लंकडला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पुण्यातील राहत्या घरातून सोमवारी रात्री अटक झाल्यानंतर मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी या प्रकरणावर सुनावणी केली.या प्रकरणाची तक्रार पुण्यातील आंबेगाव बुद्रुक भागातील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय संजय विलास होनराव यांनी केली होती. या प्रकरणात अन्य 6 साक्षीदारांनी आपला जबाब नोंदवले आहे. म्हणूनच, लंकडच्या विरोधात गुंतवणूकदारांच्या हिताच्या संरक्षणासाठीचा कायदा देखील लागू करण्यात आला आहे. या गुंतवणूक योजनेविरोधात अनेक साक्षीदार पुढे आल्यामुळे लंकडची पोलीस कोठडी आणि जामीन अर्जही फेटाळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.