अडचणीच्या काळात भाजपची बघ्याची भूमिका- चिराग पासवान
![The role of BJP in difficult times - Chirag Paswan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/chirag-paswan.jpg)
नवी दिल्ली |
लोकजनशक्ती पक्षातील संघर्षांत भाजपने बघ्याची भूमिका घेतल्याने दुखावलो असल्याची प्रतिक्रिया खासदार चिराग पासवान यांनी व्यक्त केली आहे. हे संबंध असे एकतर्फी राहू शकत नाही. मला जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला तर भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने सर्व पर्याय पडताळून पाहिले जातील, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. माझे वडील रामविलास पासवान नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीले. पण माझ्या अडचणीच्या काळात भाजपने साथ दिली नाही अशी नाराजी त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा विश्वास आहे. मात्र जर भाजपकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला तर लोकजनशक्ती पक्षाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
सध्याच्या पक्षांतर्गत बंडाळीच्या काळात भाजपने मदत केली काय असे विचारता, भाजपने बघ्याची भूमिका घेतली, तर संयुक्त जनता दलाने फूट पाडण्यासाठी हातभार लावला, असा आरोप चिराग यांनी केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दलित व्यक्ती मोठा होऊ नये असे वाटते, यापूर्वीही त्यांनी लोकजनशक्ती पक्ष कमकुवत होण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप चिराग यांनी केला. चिराग यांचे काका पशुपती पारस यांनी लोकजनशक्तीच्या पाच खासदारांना बरोबर घेऊन नवा गट स्थापन केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात पारस यांना स्थान मिळण्याची चर्चा सुरू आहे. मात्र लोकजनशक्ती पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना स्थान देणे अमान्य आहे, असे चिराग यांनी स्पष्ट केले. पारस यांना अपक्ष म्हणून घ्यावे पण लोकजनशक्तीचे प्रतिनिधी म्हणून नको असे त्यांनी बजावले. पशुपती किंवा माझा गट अधिकृत हे आता निवडणूक आयोगच ठरवेल, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावर भाजप आघाडीचे घटक आहात काय? असे विचारता हे भाजपनेच ठरवायचे आहे असे उत्तर त्यांनी दिले. राष्ट्रीय जनता दल तसेच काँग्रेसमधील मित्रांनी बिहारमध्ये आघाडीसाठी संपर्क साधला आहे, असेही ते म्हणाले.