गाझियाबादप्रकरणी ट्वीटबंदी! पोलीस चौकशीनंतर ट्विटरकडून संदेशांवर निर्बंध…
![Tweet ban on Ghaziabad case! Restrictions on messages from Twitter after police interrogation ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Twitter-e.jpg)
- पोलीस चौकशीनंतर ट्विटरकडून संदेशांवर निर्बंध
नवी दिल्ली |
जातीय तणाव निर्माण केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर ट्विटर इंडियाने उत्तर प्रदेशातील वयोवृद्ध मुस्लीम व्यक्तीवर झालेल्या कथित हल्ल्यासंदर्भातील ५० ट्वीट संदेशांवर सोमवारी निर्बंध घातले. लोनी (गाझियाबाद) येथील अब्दुल समद सैफी या मुस्लीम व्यक्तीवर हल्ला करून त्यांची दाढी कापण्यात येत असल्याची चित्रफीत रोखण्यात आल्याचे ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘‘आरोपीने आपल्याला रिक्षाने निर्जनस्थळी नेऊन तेथे मारहाण केली आणि ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडले,’’ असे सैफी यांनी फेसबुकवरील थेट प्रक्षेपणात म्हटले होते. तथापि, पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळला.
‘‘आरोपीने सैफी यांच्याकडून ‘तावीज’ खरेदी केला होता, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याने त्याने त्यांना मारहाण केली, असे पोलिसांनी स्पष्ट केले होते. सैफी यांच्यावरील कथित हल्ल्याची चित्रफीत आणि त्याबाबतचे प्रतिक्रियात्मक संदेश याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटरसह मोहम्मद झुबेर आणि राणा अय्युब या पत्रकारांवरही गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर ट्विटरने ५० ट्वीट संदेशांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
आपल्या देशाच्या धोरणात स्पष्ट केल्यानुसार, काही विशिष्ट आशय असलेला किंवा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मजकुराला प्रतिबंध करणे आवश्यक ठरू शकते. प्रतिबंध केलेला आशयाचा मजकूर एखाद्या विशिष्ट देशात किंवा अधिकारक्षेत्रात बेकायदा ठरवलेला असतो. या संदर्भात आम्ही ट्विटर खातेधारकांना थेट सूचित केले, असे ‘ट्विटर इंडिया’च्या निवेदनात म्हटले आहे.