पुण्यात पर्यटनस्थळी गर्दी वाढल्यास निर्बंध वाढवणार, अजित पवारांचा इशारा
![Ajit Pawar warns of increasing restrictions on tourist attractions in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Ajit-Pawar1-2.jpg)
पुणे – पुण्यात कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यानुसार शनिवार, रविवार सर्व दुकानं बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे विकेंडला पर्यटकांची पर्यटनस्थळी गर्दी होत असल्याने अजित पवारांनी पर्यटकांना तंबी दिली आहे. पर्यटनस्थळी गर्दी झाल्यास येत्या काळात निर्बंध आणखी वाढवणार असल्याचा इशारा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसंच, पुण्याबाहेर फिरायला जाणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार असंही त्यांनी सांगितलं आहे.
अजित पवार यांनी आज पुण्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी सर्व बंद राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात येईल. ग्रामीण भागातही हे नियम लागू राहणार आहे, असं पवार यांनी सांगितलं. परिस्थिती नियंत्रणात आली तर नियमात बदल केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी महाबळेश्वर, खोपोली, लोणावळा आणि खंडाळ्यात गर्दी करायला सुरुवात केली आहे. नागरिकांनी पर्यटन स्थळी येऊन गर्दी करू नये. पावसात भिजू नये. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्व काही बंद असताना तुम्ही घराबाहेर पडण्याचं कारणच नाही, असं त्यांनी सांगितलं. तरुण पिढी नाराज होण्याची शक्यता आहे. पण अमेरिकेत शंभर टक्के लसीकरण झालेलं असतानाही तिथे तिसरी लाट आली. आपल्याकडे अजूनही लसीकरण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जनतेच्या जिवीताची खबरदारी घेणं हे आमचं कामच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.