सांगलीत डिग्रजमध्ये बिबटय़ाचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली |
सांगलीजवळ डिग्रज परिसरामध्ये बिबटय़ाचा वावर असल्याचे शनिवारी सकाळी उमटलेल्या पावलांच्या ठशावरून स्पष्ट झाले. उसाचे अमर्याद क्षेत्र असल्याने या बिबटय़ाचा माग काढण्यात वन विभागाला जिकिरीचे बनल्याने लोकांनाच सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सांगलीपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कसबे डिग्रज येथे बिबटय़ाचा वावर असल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू झाली. डिग्रज येथील हॉटेल शिलेदार जवळील शेतातून गेल्याचे ठसे मिळाले आहेत.
डिग्रजच्या शिवारातून तुंगच्या दिशेने महामार्ग ओलांडून बिबटय़ा गेल्याचा माग काढण्यात आला आहे. मात्र तेथून पुढे उसाच्या फडामध्ये तो शिरल्याने त्याची पुढील दिशा कळालेली नाही. बिबटय़ा आल्याची बातमी समजताच वनविभाग आणि संबंधित लोकांनी येऊन तत्काळ पंचनामा केला आहे. बिबटय़ाच्या पाउलखुणांवरून पूर्ण वाढ झालेला हा प्राणी असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्हयातील दत्तवाड परिसरामध्येही बिबटय़ा दिसल्याची चर्चा होती. मात्र तो हा नसावा अशी शक्यता मानद वन्य जीव रक्षक पापा पाटील यांनी सांगितले. डिग्रज, तुंग परिसरामध्ये या बिबटय़ाचे आगमन झाले असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्राणिमित्रांनी व वन विभागाने केले आहे.




