महाविकास आघाडीचाच मराठा आरक्षणास विरोध- चंद्रकांत पाटील
![Adv. Trapped Nitin Landage - Chandrakant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Chandrakant-Patil-1.jpg)
- चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल
सांगली |
महाविकास आघाडीला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नसल्याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्वचिार याचिका दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केला. इस्लामपूरजवळ पेठ येथे नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल याठिकाणी शनिवारी विविध कार्यक्रमानिमित्ताने आ. पाटील उपस्थित होते. या वेळी माजी खासदार नीलेश राणे, आ. सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार बैठकीमध्ये आ. पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारने आरक्षण व अन्य प्रश्नाबाबत राज्याचे वाटोळे करण्याचे धोरण स्वीकारले असल्याचा आरोप केला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडली गेली नाही. जे देवेंद्र करायचे ते हे सरकार करत नाही. फक्त भेटी, शिष्टमंडळ असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे तुम्ही समाजाला मूर्ख समजता काय, असा सवाल करत, या सरकारला मराठा समाजाला आरक्षणच द्यायचे नसल्याने पुनर्वचिार याचिका दाखल करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जे ओबीसीसाठी ते मराठा समाजाला द्यायला काय अडचण आहे. तर राष्ट्रवादीकडून मराठा आरक्षण मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ कोटी पत्रं लिहिण्याचा प्रकार दिशाभूल करणारा आहे.त्याचबरोबर सरकारच्या निष्क्रियतेमुळे ओबीसी आरक्षण बाबत प्रश्न निर्माण झाला आहे असेही त्यांनी सांगितले. संजय राऊत यांनी पिंजऱ्यातील वाघ असल्याचे तरी मान्य केले याबद्दल धन्यवाद, असाही टोला त्यांनी लगावला.