नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शेळया-मेंढया आखाती देशाला निर्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/goat-6.jpg)
नवी दिल्ली – नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या 30 जूनला प्रथमत: 2000 शेळया-मेंढया आखाती देशाला निर्यात होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. यावेळी कृषी व प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाचे (अपेडा) महाव्यवस्थापक उपेन्द्र वत्स उपस्थित होते.
विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेळया-मेंढयांचे निर्यात करण्याचे पाऊल शासनाद्वारे उचलले जात आहे. पहिल्या टप्प्यात 30 जूनला 2000 जिवंत शेळया-मेंढया आखाती देशात निर्यात केल्या जातील. निर्यात होणाऱ्या शेळया-मेंढयांची वैद्यकीय तसेच संबधित तपासणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या खेपेच्या शेळया-मेंढया निर्यात केल्या जातील.
केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय, मिहान, एअर इंडिया यांच्या संयुक्त सहयोगातून ही योजना आखली गेल्याचे महात्मे यांनी सांगितले.
या नवीन उपक्रमाद्वारे मेंढपाळ, शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोजगाराच्या तसेच आर्थिक उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. पशुधन हे शेतकऱ्यांसाठी “एटीएम’ सारखे असते. पशुधनापासून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. भविष्यात शेळया-मेंढया निर्यातीसाठी तत्सम सहकारी संस्था निर्माण करण्यात येण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगितले.