कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात येते दोन दिवस पावसाचे
![Rain likely with thunderstorms in Mumbai, suburbs in next two-three hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Rainfall.jpg)
पुणे |
पूर्व मध्य अरबी समुद्र व लगतच्या भागापासून ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील दोन दिवस पावसाचे आहेत. तसेच पुणे जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या २४ तासांत पुणे जिल्ह्य़ात ०.३ मिलिमीटर, महाबळेश्वरमध्ये १७ मि.मी. आणि नाशिकमध्ये पाच मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील कोणत्याही जिल्ह्य़ात पाऊस झालेला नाही.
राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी जिल्ह्य़ात ४१.७ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी १८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे करण्यात आली. दरम्यान, कोकणात २ आणि ३ जून रोजी बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २ जूनला काही ठिकाणी, तर ३ जून रोजी बऱ्याच ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट होऊन मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडय़ातही पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
- ‘एल निनो’ स्थिती सर्वसामान्यच
मोसमी वाऱ्यांचे आगमन जाहीर करण्यासाठी आकाशातील ढगांचे आच्छादन, पावसाची हजेरी आणि जमिनीलगत तसेच ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत नैर्ऋत्येकडून वारे वाहणे आवश्यक आहे. या स्थितीनुसार यंदा मोसमी वारे ३ जून रोजी के रळमध्ये दाखल होणार आहेत. तसेच विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य एल निनो स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट के ले आहे. पावसाळ्यात ही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता आहे.