निर्ढावलेल्या अधिका-यांना वठणीवर आणणार; मराठा महासंघाचे आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/PHOTO-.jpg)
पिंपरी – मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पहिल्यापासून प्रयत्न करत आहे. महासंघानेच सर्वप्रथम याबाबत जनजागृती केली. आरक्षण हा आमचा हक्कच आहे, तो आम्ही मिळवणारच परंतु, राज्यातील मराठा समाजातील सर्व युवक युवतींना शिक्षण, उदयोग, व्यवसाय व व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे, असे आवाहन अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. 26) केले.
मागील वर्षी राज्य सरकारने काढलेल्या ‘श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची’ अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी. शासऩ फक्त आदेश काढून मोकळे झाले आहे. प्रत्यक्षात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेताना शाळा महाविद्यालयांकडून संपुर्ण फी भरण्याची मागणी केली जाते. चालु शैक्षणिक वर्षी प्रवेश घेताना संपुर्ण फी मागणा-या शिक्षण संस्थां विरुध्द तक्रार करण्यासाठी पुढे या, असे आवाहन पिसाळ यांनी केले.
मराठा समाजाच्या हितासाठी फक्त आदेश काढून उपयोग नाही. तर, ३१ मार्च २०१८ पर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत किती विद्यार्थ्यांना, किती रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच, कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून किती गरजु युवक युवतींना उद्योग व्यवसायासाठी किती रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. याची सविस्तर आकडेवारी नागरीकांच्या माहितीसाठी वेबसाईटवर जाहिर करावी. या दोन्ही योजनेचा मराठा समाजातील तरुणांना म्हणावा तसा उपयोग झाला नाही. या योजनेचा सक्षमपणे निधी वापरला जावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आल्याचे पिसाळ यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेत प्रदेश संघटक संतोष शंकर लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष उदय पाटील, शिवानंद लांडगे, संतोष लांडगे, धनंजय जगदाळे, विजय बो-हाडे आदी उपस्थित होते.