पशुवैद्यकीय अधिका-यावर पशुहत्येचा गुन्हा दाखल करा – नागरिकांची मागणी
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी
पिंपरी – महापालिकेच्या बेजबाबदार पशुवैद्यकीय अधिकारी अचानक गैरहजर राहिल्याने दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका पाळीव श्वानाचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुण दगडे आणि सहकारी डाॅ. बांदल यांच्यावर पशुहत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मोशीतील मनोहर बो-हाडे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मोशी येथून मनोहर बो-हाडे यांनी त्याच्या आजारी असलेल्या पाळीव श्वानावर उपचार करण्यासाठी सोमवारी (दि.25) सकाळी 10 वाजता पिंपरीतील पालिकेच्या दवाखान्यात आणले होते. त्याच शहरातील काही पाळीव श्वान घेवून अन्य नागरिकही आले होते. दवाखाना उघडल्यानंतर डाॅक्टरांची वाट पाहात सर्वजण तब्बल एक तास ताटकळत थांबले होते. डाॅक्टराविषयी तेथील कर्मचा-याकडे विचारणा केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिका-यांचा फोन आला असून ते येणार नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पशुवैद्यकीय दवाखान्यात शासकीय कार्यालयीन वेळेत संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी येतील, म्हणून शहरातील नागरिक त्यांच्या पाळीव श्वानांना घेवून उपचारासाठी आले होते. परंतू, बेजबाबदार अधिका-यांनी अचानक गैरहजर राहिल्याने उपचारासाठी आणलेल्या श्वानाचा उपचार करण्यापुर्वीची मृत्यू झाला. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात गैरहजर राहून जबाबदारी झटणा-या अधिका-यांची चाैकशी करुन कडक कारवाई करावी, तसेच श्वानाच्या मृत्यूला जबाबदार धरुन त्यांच्यावर पशुहत्येचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी मनोहर बो-हाडे, शेषराव शेटे, बाळू खरात, संजय मंजाळे यांनी केली आहे.