आता “दबंग 3′ नाय बघायचा
सलमानचा “रेस 3′ सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. त्या सिनेमाने केवळ तीनच दिवसांमध्ये 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर जरी “रेस 3’चा परफॉर्मन्स चांगला होत असला तरी विश्लेषकांनी या सिनेमाला काही खूप चांगला म्हटलेले नाही.
उलटपक्षी टीकाच खूप केली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवरच्या रिव्ह्यूमध्येही “रेस 3’ला खूप खराब सिनेमा म्हटले गेले आहे. एवढेच नव्हे तर सोशल मिडीयावर लोकांनी “रेस 3′ चा स्क्रीनप्ले, डायलॉग, ऍक्शन सिक्वेन्स, ऍक्टिंग सगळ्याची यथेच्च चेष्टाही केली. या खराब परफॉर्मन्समुळे नाराज झालेल्या सलमानच्या फॅन्सनी आता “दबंग 3’ही न बघण्यासाठी आवाहन करणारे कॅम्पेन सुरू केले आहे.
“वुई डोन्ट वॉन्ट दबंग 3′ या हॅशटॅगने सोशल मिडीयावर हे कॅम्पेन सुरू झाले आहे. “दबंग 3’मध्येही चांगली स्टोरी, सपोर्टिंग कास्ट आणि डायरेक्शन नसल्याची तक्रारही फॅन्सनी आतापासूनच करायला सुरुवात केली आहे. या दशकातील “वीर’, “जय हो’, “ट्युबलाईट’पेक्षाही “रेस 3’सर्वात वाईट सिनेमा होता. “ट्युबलाईट’ एकवेळ सहन करू. कदाचित “रेस 3’मध्येही चूक झाली हे मान्य करू. पण आता “दबंग 3′ बघण्याची चूक आम्ही करणार नाही, असे काही फॅन्सनी म्हटले आहे.