पंढरपूरचा विजय हा मविआच्या भ्रष्टाचारी-भोंगळ कारभाराला आरसा दाखविणारा : देवेंद्र फडणवीस
![For the third time in a year, the government should help now; Demand of Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Devendra-Fadnavis.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना जनतेने दिलेला कौल हा महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला जनतेने दाखविलेला आरसा आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
समाधान आवताडे यांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंढरपूरच्या जनतेने भाजपावर विश्वास दाखविला आहे. हा विजय आम्ही विठुरायाला समर्पित करतो. या मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला आरसा दाखविण्याचे काम केले आहे. सत्ताधार्यांनी साम-दाम-दंड-भेद, शक्ती आणि पैशाचा प्रचंड दुरूपयोग केला. पण, जनतेने भारतीय जनता पार्टीच्या बाजुने कौल दिला. कोरोनाच्या काळात या सरकारने कुणालाच मदत नाही. बारा-बलुतेदारांमध्ये त्यामुळे प्रचंड नाराजी आहे. वीज तोडणीने तर जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. या सर्व नाराजीचा एकत्रित परिणाम झाला. हा विजय विठ्ठलाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हा त्यांच्याच चरणी आम्ही समर्पित करतो. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही प्रचंड मेहनत घेतली. या निवडणुकीत प्रशांत परिचारक, उमेश परिचारक हे राम-लक्ष्मणासारखे उमेदवारासोबत होते. पक्षाचे आमदार, खासदार, दोन्ही माजी मंत्री सुभाषबापू देशमुख, विजयराव देशमुख, निवडणूक प्रभारी, खा. रणजित नाईक निंबाळकर, खा. जयसिद्धेश्वर स्वामी, गोपीचंद पडळकर, राम सातपुते, कल्याण शेट्टी या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.