पिंपरी-चिंचवडमध्ये ३०-४० नगरसेवक शिवसेनेचे असतील : शहरप्रमुख सचिन भोसले
- महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला आता खिंडीत गाठणार
- शिवसेनेची शहर पातळीवर संघटनात्मक बांधणीला सुरूवात
पिंपरी । अधिक दिवे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचे ३० ते ४० नगरसेवक निवडूण येतील. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आगामी काळात सत्ताधारी भाजपाला आंदोलनाच्या माध्यमातून खिंडीत गाठणार आहोत, अशी भूमिका शिवसेनेचे नवनिर्वाचित शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी मांडली.
नवनिर्वाचित शहरप्रमुख भोसले यांच्याशी ‘महाईन्यूज’ने संवाद साधला. यावेळी संघटना, संघटनेतील गट-तट, आगामी निवडणुकीतील मोर्चेबांधणी आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
भोसले म्हणाले की, शहरप्रमुख पदाची जबाबदारी मिळाली असली, तरी सामान्य शिवसैनिक म्हणून मी काम करणार आहे. सध्या कोरोनाचे सावट आहेत. त्यामुळे आंदोलनात्मक भूमिका घेता येत नाही. आगामी काळात भाजपाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडण्यासाठी आंदोलन तीव्र करणार आहोत.
शहर संघटनात्मक नियुक्त्या लवकरच…
शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी अशा तिनही मतदार संघातील कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. लवकर संघटनेतील सर्वस्तरावर पदनियुक्त्या करण्यात येतील. संघटनेसाठी प्रामाणिक काम करणाऱ्यांची फौज तयार कणार आहे, असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.
गॉडफादर नाही…स्वबळावर जबाबदारी…
संघटनेतील महत्वाची जबाबदारी मिळाली. पण, मला कोणी राजकीय ‘गॉडफादर’ नाही. मात्र, पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या कामाची पद्धत पाहिली आहे. मी कोणाशीही आर्थिक मिंदा नाही. कुणाच्या शिफारशीने मला शहरप्रमुखपदाची जबाबदारी मिळालेली नाही. विशेष म्हणजे, पक्षातील आजी-माजी खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यांच्याशी माझा चांगला संवाद आहे. त्यामुळेच कदाचित पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली असावी, अशा भावना भोसले यांनी व्यक्त केल्या.