शेतकरी फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादी आमदार बबनराव शिंदेंवर गुन्हा दाखल
सोलापूर – शेतकरी आणि सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि जि.प. सदस्य रणजितसिंह शिंदेंवर गुन्हा दाखल केला आहे.
माढा येथील जगदंबा सूतगिरणीची मालमत्ता व मशिनरीची बेकायदा खरेदीविक्री व खादी ग्रामोद्योग मंडळाचे बोगस लाभार्थी दाखवून कर्जवाटप करून शेतकरी व सरकारची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या २०८ कोटी रूपयांच्या फसवणूक प्रकरणी माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माढा न्यायालयात नागनाथ उद्धव कदम (रा उपळाई खुर्द) यांनी फिर्याद दाखल केली होती. त्या फिर्यादीनुसार माढ्याच्या प्रथम वर्ग न्यायाधीश मनिषा थोरात यांनी या प्रकरणी माढा पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३)प्रमाणे भारतीय दंड विधान कलम ४०९, ४२०, ४६४, ४६५, ३४ प्रमाणे चौकशी करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.