वायसीएम रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवा बंद; कोविड रुग्णांना समर्पित
![Outpatient services at YCM Hospital closed; Dedicated to covid patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Ycm-hospital-pimpri.jpg)
पिंपरी महाईन्यूज
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता योग्य उपचार आणि बेड्स उपलब्ध व्हावेत, यासाठी महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आजपासून पूर्णतः कोविड-१९ समर्पित करण्यात आले आहे. अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
मार्च २०२० मध्ये पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय कोविड-१९ समर्पित रुग्णालय म्हणून कार्यान्वीत करण्यात आले. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या रुग्णालयामध्ये इतर आजारांच्या रुग्णांवरही उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सद्यस्थितीत कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेता वायसीएम रुग्णालयास पूर्णतः कोविड-१९ समर्पित रुग्णालय करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने बेड उपलब्ध होऊन त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.
वायसीएम रुग्णालयास पूर्णतः कोविड-१९ समर्पित रुग्णालय करण्यात आले असून येथील सर्व नॉन-कोविड, विनातातडी ओपीडी सेवा बंद करण्यात आली आहे. वायसीएम रुग्णालयात फक्त कोविड ओपीडी, नॉन-कोविड तातडीक ओपीडी आणि आयपीडी सेवा सुरु राहतील. वायसीएम रुग्णालयातील चौथा मजला सर्जिकल स्पेशालिटी व बालरोग विभागासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. कोविड व नॉन-कोविड गरोदर महिलांसाठीचा आंतररुग्ण वॉर्ड पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे.