राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांत तापामानाचा पारा चाळीशी पार
![The temperature in 'Ya' district of the state has crossed 40 degrees Celsius](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/weather-1458899092_835x547-1.jpg)
मुंबई – राज्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच मे महिन्याच्या कडक उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. घामाच्या धारा आणि उकाड्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये तर तापमानाने चाळीशी गाठली आहे. अकोल्यात 42.1, तर परभणी जिल्ह्यात 41.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल नागपूर आणि गोंदियाचा क्रमांक आहे. नागपुरात 40.2 अंश सेल्सियस तर गोंदियामध्ये 40 अंशावर तापमान पोहोचलं आहे. तसेच चंद्रपुरात 42 तर ब्रह्मपुरी इथे 41.3 अंश सेल्सियसवर तापमान पोहोचलं आहे. अमरावतीमध्ये देखील तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, एकीकडे वाढणारं कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे वाढणारा उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस उकाडा जास्त वाढत असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यायला हवी. अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ इथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या आठवड्यात या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तापमान राहिल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.