कर्मचाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार; बॉसला सक्तमजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Molestation_2017082358.jpg)
पुणे – कामाला असलेल्या कर्मचा-याच्या पत्नीवर बलात्कार करणा-या कंपनीच्या मालकाला सात वर्षे तुरुंगवास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी हा आदेश दिला.
शेषराम रामदत्त मौर्या (वय ३५, रा. सुंदर आकाश सोसायटी, हडपसर) असे शिक्षा दिलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार मौर्या याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेब्रुवारी २०१६ मध्ये पिसोळीत हा प्रकार घडला होता.
मौर्या याची पिसोळी येथील कुमार अॅन्ड सन्स ही स्लायडिंग विंडो बनविण्याची कंपनी आहे. या कंपनीत पीडितेचा पती कामाला होता. त्यामुळे मौर्या याने त्याचा पिसोळीतील हिल व्ह्यू सोसायटीतील फ्लॅट फिर्यादी यांना राहण्यासाठी दिला होता. घटनेच्या दिवशी फिर्यादी काही कामानिमित्त बाहेर गेले असता मौर्याने पीडितेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकीही दिली होती. याबाबत तक्रार दिल्यानंतर तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस हवालदार रवींद्र भोसले, विशाल गवळी यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकारी वकील सुरेश गवळी यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक गणेश कुलाल, सहायक पोलीस फौजदार सुनील कोलते आणि राजेंद्र नलावडे यांनी कामकाज पाहिले. दंडाच्या रकमेतील १० हजार रुपये पीडित महिलेला देण्यात यावे, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.